कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेवून सेनेने केले ‘शिवसंपर्क अभियान’ स्थगित

uddhav thackeray

मुंबई – राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा हात-पाय पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे नियोजित सर्वच कार्यक्रम आणि दौरे रद्द केले आहेत.यातच आता या संकटाचे भान राखत शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात येणारे शिवसंपर्क अभियान स्थगित करण्यात आले आहे.

गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानुसारच, 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार होतं मात्र आता हे अभियान होणार नसल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना दिली आहे.सोबतच त्यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.

दरम्यान, कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वीच राज्यभरात संवाद यात्रा काढण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात आले. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने राष्ट्रवादीवर सध्या टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या