राजकारणात येऊन बदल घडवू पाहणाऱ्या युवकांसाठी काँग्रेसचे ‘सुपर १०००’

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील एक हजार युवकांना संधी देणार आहे. जे युवक राजकारणाला करिअर समजतात तसेच राजकीय नेत्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः राजकारणात उतरून एक परिवर्तन घडविण्याची हिंमत ठेवतात. अशा महत्वाकांक्षी युवकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुपर १००० हे व्यासपीठ खुले केलेले आहे.

या उपक्रमाची घोषणा काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व प्रदेश उपाध्यक्ष तथा या उपक्रमाचे राज्य समन्वयक शिवराज मोरे यांनी केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नोंदणीची मुदत वाढविली असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि, युवक हे देशाचे भविष्य आहेत. युवकांनी राजकारणात आले पाहिजे हि नुसती घोषणा नसून ती सत्यात उतरवणे आवश्यक आहे. व यासाठीच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली ‘सुपर १०००’ हा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम घोषित केला आहे.

या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये काही प्रश्न उमेदवारांना विचारले गेले आहेत. त्या प्रश्नांच्या आधारे त्या उमेदवाराचा राजकारणाकडे बघण्याचा कल व त्याची पार्श्वभूमी समजून येईल. नोंदणी झालेल्या फॉर्म मधून फक्त १००० युवक राज्यभरातून निवडले जातील ज्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल.

या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना बूथ व्यवस्थापन, मीडिया ट्रेनिंग, भाषण कौशल्य आदी निवडणुकीला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवराज मोरे व शहर जिल्हाध्यक्ष मुजफ्फरखान पठान यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या