कॉंग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग,सपा-बसपाची स्वतंत्र आघाडी

लखनौ- लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,सपा-बसप यांची जागावाटपाबाबत बोलणीही पार पडल्याची माहिती आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलालाही महाआघाडीत सोबत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसप 38, समाजवादी पक्ष 37,  तर रालोद तीन अशा 78 जागांवर उमेदवार देणार आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.