मराठवाड्यात कॉंग्रेसला मोठा धक्का, या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा पूर्वी स्व. विलासराव देशमुख आणि आता अमित देशमुख यांच्या विश्वासातील राजेश भाऊसाहेब देशमुख यांचा आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत यशःश्री या निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश होताच राजेश देशमुख यांची थेट भाजप महाराष्ट्र प्रदेश ‘चिटणीस’ पदी नियुक्ती झाल्याने भाजपला जिल्ह्यात एक स्टार प्रचारक मिळाला आहे.

वैद्यनाथ देवल कमिटीचे सेक्रेटरी म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा विशेष उल्लेख केला जातो. मंदिरात विशेष लक्ष देऊन त्यांनी विकासाची कास धरून मंदिराचा चेहरामोहरा बदलला आहे. पुरातन मंदिराचे पावित्र्य जपत त्यांनी नवीन भक्त निवास, यात्री निवास, व्यापारी संकुल बांधकामावर लक्ष केंद्रित केले आहे.

या व्यतिरिक्त त्यांना सर्वजण उत्कृष्ट संघटक व उमदे नेतृत्व म्हणून ओळखतात. परळी वैजनाथ तालुक्यात आणि जिल्ह्यात काँग्रेस रुजावी म्हणून त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक काँग्रेस श्रेष्ठींना होते. स्व. विलासराव देशमुख यांच्याशी राजेश देशमुखांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून तसेच नगरसेवक म्हणून त्यांनी जनसामान्यांची अनेक कामे केली आहेत. एकादशीचे फराळ वाटप असो की रमजानमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करत राजेश देशमुख सतत सोशल इंजिनियरींगवर भर देत आले आहेत.

स्व. भय्यू महाराजांच्या सूर्योदय परिवारामार्फत चालणाऱ्या कृषीतिर्थ योजनेचा लाभ येथील लोकांना व्हावा म्हणून राजेश देशमुख यांनी  विशेष मेहनत घेतली आहे. शेतकऱ्यांना होईल ती शक्य मदत ते करतात. शैक्षणिक क्षेत्रात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाचे दालन उघडे करून दिले आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अशा विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राजेश देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळणार असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे