कॉंग्रेसचे जनआक्रोश आंदोलन म्हणजे ढोंगीपणा – मधू चव्हाण

congress-flag

सांगली : भारतीय जनता पक्षप्रणित केंद्र शासनाचा नोटाबंदीचा निर्णय हा ऐतिहासिक चलन बदलाचा निर्णय होता. मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस नेत्यांसह त्यांच्या संबंधितांना बसला. या निर्णयामुळे अनेकांचे दोन नंबरचे व्यवहार बंद झाले, तर अनेकांचे कोट्यवधी रूपये बुडाले. अशा पैसा बुडालेल्यांसाठीच कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन हाती घेतले आहे. त्यातून कॉंग्रेसचा खरा चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माजी आमदार मधू चव्हाण यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केली.

नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कॉंग्रेसने बुधवार दि. ८ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे, तर भाजपने या निर्णयाचे स्वागत करीत हा दिवस काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे. त्याच्या तयारीसाठी सांगलीला मधू चव्हाण येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.

नोटाबंदी निर्णयामुळे सर्वसामान्यांना थोडासा त्रास झाला, याची कबुली देऊन मधू चव्हाण म्हणाले, की या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल तीन लाख कोटी रूपये व्यवहारात आले आहेत. एक लाख ७५ हजार कोटी रूपयांची अनामत विविध बँकात ठेव स्वरूपात जमा झाली आहे. विविध बँकातील १८ लाख संशयास्पद बँक खाती उघडकीस आली असून १३ लाख ५० हजार करदाते वाढले आहेत. देशात तीन लाख बोगस कंपन्या असल्याचेही सामोरे आले असून ८० कोटी रूपयांची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील १६ हजार कोटी रूपये इतका काळा पैसा नष्ट झाला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तेत असलेले कॉंग्रेस नेते सत्तेची अवघी तीन वर्षे पूर्ण केलेल्या भाजपकडे विकासकामांचा लेखाजोखा मागत आहे. हेच सर्वसामान्य जनतेला न पटण्यासारखे आहे. सर्वसामान्य शेतकरी व नागरिक याला केंद्रबिंदू मानून भाजपने संपर्क, संवाद व सेवा या त्रिसूत्रीनुसार कामाची पध्दत अवलंबली आहे. त्यातून सर्वच घटकांना विकासाची ठाम हमी मिळत असल्यानेच गत तीन वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळत आहे, असा दावाही मधू चव्हाण यांनी केला.Loading…
Loading...