काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारले

sangamlal gupta

संगीपूर : उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ राडा झाला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये खासदार संगमलाल गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. गुप्ता यांच्या गाडीचेही नुकसान झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संगीपूर विकास खंड येथे एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदारल संगमलाल गुप्ता उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि आमदार आराधना मिश्रा देखील उपस्थित होते. मात्र, यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या ही भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक होती. हाणामारी सुरु झाल्यानंतर खासदार गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी कायदा मोडून खासदारांसह भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या