… तर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करावी यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरूच असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शिवसेना आणि भाजप युती न झाल्यास कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल, असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 4 वर्षात भाजप-शिवसेना यांनी एकही निवडणूक एकत्र लढलेली नाहीये. त्याचा फटका दोन्ही पक्षाला बसतो आहे. पालघर पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी चुकीचं राजकारण केलं असून, युतीमध्ये कटुता निर्माण केली आहे. दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातून एकास उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केले होते. पण याबाबत कसलीच खातरजमा न करता उद्धव ठाकरे यांनी वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून तिकीट दिले. हे त्याचं चूकीचं राजकारण होतं.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्ययाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मात्र अद्यापही भाजप नेते युतीसाठी आशावादी असून, त्यांच्याकडून सातत्याने युतीसाठी शिवसेनेला चुचकारण्याचे काम सुरु आहे. आता शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार की भाजपसोबत पुन्हा एकदा युती करणार ? शिवसेनेच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.