देशाची संपत्ती लुटारुंपासून वाचवण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल : एच. के. पाटील 

h k patil

सातारा – केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगदपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडाऊन, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला आहे. याला काँग्रेसचा विरोध असून देशाची संपत्ती लुटणाऱ्यांविरोधात उभे राहून देशाची संपत्ती विकू देणार नाही. देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक आहेत, या संपत्तीचे जतन करु आणि देशाची संपत्ती लुटारुंपासून वाचवण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान आज सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतिल लोंढे, माजी आमदार उल्हासदादा पवार, व्यर्थ न हो बलिदान अभियानाचे समन्वयक व प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, आ. विक्रम सावंत, बाळासाहेब कदम, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वांतत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला जगात ताठ मानेने उभे केले, विकासाच्या विविध योजना राबवून देशात क्रांती घडवून आणली त्या पंडित नेहरुंचा विसर केंद्रातील भारतीय जनता पक्षाला पडला आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताना पंडित नेहरुंचा फोटो टाकण्याचे सौजन्यही न दाखवता त्यांना वगळून देशाच्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. ७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला जात आहे. ब्रिटीश राजवटीसारखेच केंद्रातील सध्याचे सरकार जुलमी अन्यायी, अत्याचारी, सरकार असून त्याविरोधात पेटून उठले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ६० वर्षानिमित्त प्रदेश काँग्रेस लवकरच महाराष्ट्राच्या निर्मितीत काँग्रेस पक्षाचे योगदार हा कार्यक्रम घेऊन येणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या सरकारचे राज्याच्या जडणघडणीतील योगदान यातून जनतेसमोर आणले जाणार आहे. जनतेने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहनही पटोले यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या