आघाडीत बिघाडीची शक्यता ? मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत

mhv

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरली तर काँग्रेस सर्व २२७ जागांवर लढेल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेईल. हायकमांडने आदेश दिले तर २२७ जागांची काँग्रेसची तयारी असल्याचं गायकवाड म्हणाले आहेत.

निवडणुकांसंदर्भात अजून शिवसेना आणि राष्ट्रवादीशी अजून चर्चा झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीचे एकत्र जमले नाही तर काँग्रेस एकटी लढेल, असे गायकवाड म्हणाले. मात्र याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर काँग्रेस कसेही लढली तरी पराभव नक्की आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी मारला आहे.

दरम्यान, ज्यांनी (भाजप) मुंबई महानगरपालिकेत आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल त्यांनी भाजपला केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली. त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या