काँग्रेसमधील घडामोडीत सुशीलकुमार शिंदेंनी लक्ष घालावे – महेश कोठे

सोलापूर – काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वाद आणि सुरू असलेल्या घडामोडीत सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी व विद्यमान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सांगितले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कोठे म्हणाले, काँग्रेसमध्ये असलेला एक गट वरिष्ठांचा गैरसमज करतो. ऐकीव माहितीवर तातडीने निर्णय घेण्याऐवजी माहितीची खात्री करून निर्णय झाला तर ते काँग्रेसच्या फायद्याचे ठरणार आहे. सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीत शिंदेंनी लक्ष घालावे. लोकसभा निवडणुकासाठी आम्ही शिवसेनेसाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहोत, असे कोठे म्हणाले.

खरटमल यांना संधी देणार का, असे विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करणार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. इच्छुकांना त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे काम आमचे असेल.” खरटमल यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले