शिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता काही दिवसांमध्येच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मोर्चेबांधणीसाठी भाजप आणि सेनेने जनसंपर्क यांत्रांचा धडका लावला आहे. तर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष आणि सर्व कार्यकारी अध्यक्ष सहभागी होणार आहेत. तसेच ऑगस्टमध्ये ही यात्रा निघणार असून पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सभा, मेळावे, बैठका घेऊन थोरात हे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम करणार आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातल्या गुरुकुंज मोझरी इथून महाजनादेश यात्रेला 1 ऑगस्टपासून सुरुवात करणार आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेसने देखील जनसंपर्क वाढवण्यासाठी पक्षाला पुन्हा एकदा उभारी येण्यासाठी दौऱ्याची घोषणा केली आहे.