चंद्रकांत पाटलांचे अनेक दावे या केवळ बोलण्याच्या गोष्टी : बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे आमदार पुढच्या आठवड्यात राजीनामा देऊन भाजपमध्ये येणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अस काही होणार नसून कॉंग्रेस आघाडी विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे आमदार लवकरच राजीनामे देऊन भाजपात येणार आहेत. ते म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्यास राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी असे इच्छुक आमदार आपले राजीनामे सादर करतील, नंतर त्यांना भाजपात घेतले जाईल. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांची नावे लवकरच पुढे येतील, असेही ते म्हणाले.

यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ह्या सगळ्या बोलण्याची गोष्टी झाल्या. अस काही होणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांचा दावा खोडून काढला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा एक ही आमदार राजीनामा देणार नाही. तसेच कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. चंद्रकांत दादा अब की बार २२० पार असा दावा करत असले तरी त्या बोलण्याच्या गोष्टी झाल्या. वास्तवात अस होणार नाही, असे थोरात म्हणाले.

दरम्यान आज बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. तसेच त्यांच्या बरोबर प्रदेश कॉंग्रेसच्या समितीत थोरात यांच्या बरोबरीने नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.