काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत! बदनामी प्रकरणी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

nana

चंद्रपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले चंद्रपुरात दौऱ्यावर असताना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिल्याचा दावा केला होता. पण भाजपाच्या कोणत्याही नगरसेवकांनी नाना पटोले यांची भेट घेतली नाही. केवळ भाजपा नगरसेवकांची बदनामी करण्यासाठीच त्यांनी पत्रपरिषदेत राजकीय हेतूने चुकीची माहिती दिल्याचे सांगत भाजपाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी रामनगर पोलीस ठाण्यात पटोलेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ८ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाच्या काही नगरसेवकांनी आपली भेट घेत महानगरपालिकेतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात विशेषता भाजपामध्ये एकच खळबळ उडाली होती.

भाजप नगरसेवकांची जाणिवपूर्वक बदनामी
पटोले यांचा हा दावा केवळ राजकीय हेतुपुरस्सर असून, पटोले यांनी भाजपाच्या कोणत्याही नगरसेवकाचे नाव उघड केलेले नाही. त्यांच्याकडे कोणी लेखी निवेदन दिले व कोणत्या तारखेस दिलेले आहे, हे सुद्धा नमूद केलेले नाही. अशा परिस्थितीत भाजपाच्या सर्वच नगरसेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी पटोलेंविरुद्धच्या तक्रारीत म्हटले आहे.

केवळ भाजपा नगरसेवकांची जाणिवपूर्वक बदनामी करण्यासाठी पटोलेंचे हे विधान होते,असेही कंचर्लावार यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रार देताना त्यांच्यासोबत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?
चंद्रपूर महानगर पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांची राज्यशासनाने चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेस आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी केल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ८ जून रोजी पत्रकार परिषदेत केला होता. सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे दिले आहे पटोले यांनी सांगितले. या गैरव्यवहाराची एखाद्या समिती मार्फत चौकशी केली जाईल, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. विधानसभेतसुद्धा मनपातील गैरव्यवहाराची प्रकरण लावून धरू असे पटोले यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP