शिवसेना मोर्चा काढत आपली जबाबदारी झटकतेय, शेतकरीच त्यांचा निषेध करतील – थोरात

blank

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेचा पीकविमा कंपनी विरोधातील मोर्चा म्हणजे नाटक असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे वेळेत आणि योग्य दिले पाहिजे, ते मोर्चा काढून जबाबदारी झटकत आहेत. भाजप-सेनेच्या सरकारने खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रडविले. शेतकरी बांधवच आता या मोर्चेकऱ्यांचा निषेध करतील. असा घणाघातही थोरात यांनी केला आहे.

पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान, पीक विम्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनाच ‘इशारा मोर्चा’ काढत आहे. भाजपा, शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात मग त्यांच्या यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात, असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.

ज्याचं अन्न खातोय त्याला जागतोय, मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक

ज्याचं अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे, विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे पहाव. मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेकडून पिक विमा कंपन्यां विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ठाकरे बोलत होते.