विखेंच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी काँग्रेस लागली कामाला!

ahmadnagar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- काँग्रेस पक्षाने आपल्या युवा फळीला संघटना बांधणीसाठी मैदानात उतरविले आहे. त्यानुसार अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा हे कालपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

काल पहिल्या दिवसाची सांगता ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाची बैठक घेऊन झाली. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बैठकीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरण काळे म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे उमेदवार होता. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काहींनी अचानक भाजपमध्ये उडी मारल्यामुळे पक्षात जागा रिकामी झाली.

त्यामुळे तयारीत नसलेले सुरेश थोरात यांना उमेदवारी देण्यात आली. थोरात डगमगले नाही. निर्भीडपणे निवडणुकीला सामोरे गेले. वाडीवस्तीवर जात प्रचार केला. थोरात यांनी मोठ्या संख्येने मतदान घेतले. आज ज्या पद्धतीने युवक या ठिकाणी एकत्र जमले आहेत ही आगामी काळातील बदलाची नांदी आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात युवकच आगामी काळात परिवर्तन करतील अशी अपेक्षा व्यक्त करत यावेळी काळे यांनी युवकांना जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी शिर्डी मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते सुरेशजी थोरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, राहता समन्वयक राजेंद्र बोरुडे, गौरव डोंगरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.