‘कॉंग्रेस’चा हल्लाबोल; ‘कोरोना’च्या गंभीर संकटातही भाजपने असंवेदनशीलता कळस गाठला…

मुंबई : ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपाने कोरोनाच्या गंभीर संकटातही असंवेदनशीलता कळस गाठला आहे. गरीब, कामगार, कष्टकरी तसेच हातावर पोट असलेले लोक या संकटात होरपळले जात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे,’ असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

तसेच कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी अनेक जण मदतीचे हात पुढे करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करत आहेत. मात्र चंद्रकात पाटील यांनी मात्र भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा मदत निधीला देण्याचे आवाहन केले आहे.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘जनतेच्याच पैशातून मिळालेले हे वेतन सरकारच्या मदतनिधीत जमा न करता पक्षाच्या मदतनिधीत जमा करण्याचा प्रकार हा महाराष्ट्रद्रोहीच म्हणावा लागेल, असा आरोप काँग्रेसने केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा मुकाबला अत्यंत उत्तमरितीने करत असताना उगाचच विरोधास विरोध म्हणून राज्य सरकारवर टीका करत असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.