कॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील

सोलापूर : मोहोळ राष्ट्रवादीने प्रत्येक वेळेस पवारसाहेब यांचा आदेश मानून आघाडी धर्म पाळत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेला मदत केली. नेहमीच मोहोळमधून मोठे मताधिक्य दिले. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर इतर निवडणुकीत स्थानिक मोहोळ काँग्रेसने कुठल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य केले नाही. सोलापूर कॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये, असा सूचक इशारा लोकनेते शुगरचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी दिला आहे.

सोलापूर लोकसभेला काँग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये. निष्टावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार. मात्र मोहोळ विधानसभेला मा.राजनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आनणार असल्याचे सदस्य बाळराजे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी तालुक्यातून कशी हद्दपार होईल यासाठीच सातत्याने त्यांनी प्रयत्न केला आहे. प्रत्येक निवडणुकीत जातीयवादी शक्तींना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करण्याचा प्रयत्न चालूच आहे. अशावेळेस काँग्रेसच्या वरीष्ठ नेतेमंडळीनी कधीच मोहोळ काँग्रेसला समजावून सांगत आघाडी धर्म पाळण्यास सांगितलं नाही किंवा कोणताच आदेश दिला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करण्याचे काम काँग्रेस नेतेमंडळीनी केले आहे. मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच लोकसभेला काँग्रेसला मदत करायची की नाही याबद्दल आम्ही निर्णय घेणार आहे, पण यानिमित्ताने एक सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा बाळराजे पाटील यांनी दिला.