कॉंग्रेसला अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना : शिवसेना 

उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सध्या प्रभारी अध्यक्ष नेमला आहे. अशातच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधी यांच्या इतरांवरील पक्षपाताच्या आरोपांचे नंतर पाहू, पण काँग्रेसचे संघटन उभे करणे व लोकांना कामास लावणे याच्या आड तर कोणी आले नव्हते. राहुल गांधींच्या राजीनाम्याचा व त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर केला पाहिजे. काँगेसला एक अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना! अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा काय आहे सामनाचा अग्रलेख …

राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा आता सार्वजनिक केला आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप सतत होत असतो. त्या आरोपातून पक्षाला एकदा तरी मुक्ती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलले आहे. राहुल गांधी म्हणजे नेहरू, इंदिराजी किंवा राजीवही नव्हेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने देशात हलकल्लोळ वगैरे झालाय, लोक रस्त्यावर आलेत असे चित्र नाही, पण काँग्रेस पक्षात मात्र भूकंप झाला आहे. भूकंपाच्या हादऱ्यातून पडझड होते. काँग्रेस पक्ष आधीच इतका कोसळला आहे की, पडझडीसाठीही तो उरलेला नाही. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात मोठी कामगिरी बजावलेल्या पक्षाची ही शोकांतिका आहे. काँग्रेस पक्षाच्या दारात चिरा-पणती लावायला तरी कुणी उरेल काय? असे आजचे चित्र आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर राहुल गांधी यांनी नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारिणीवर सोपवली आहे, पण काँग्रेसला संजीवनी देऊ शकेल असा एकही नेता दिसत नाही. मोतीलाल व्होरा (वय 89) व सुशीलकुमार शिंदे (वय 78) हे दोन जुनेजाणते आहेत. मुकुल वासनीक, ए.के. ऍन्टोनींची नावे सुरू आहेत, पण मृत काँग्रेसला हे जीवदान देऊ शकतील काय? भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या कित्येक मैल पुढे जाऊन पोहोचला आहे. 1971 साली

काँगेस ज्या स्थानावर होती

तिथे आज भाजप आहे. मोदी व अमित शहा यांच्या जोडगोळीने सारा देश व्यापला आहे. संघटन, यंत्रणा, सत्ता व आर्थिक ताकद या तुलनेत काँग्रेस भाजपच्या पिछाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी मेहनत घेतली, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शिवाय दलित आणि मुसलमान तसेच उच्चवर्णीय हा काँग्रेसचा पारंपरिक आधार प्रादेशिक पक्षांनी तोडला आहे. काँग्रेसचे अनेक वतनदार लोकांनी फेकून दिले व दरबारी राजकारण यापुढे चालणार नाही असा स्पष्ट संदेशच या निवडणुकीतून दिला. राहुल गांधी यांनी काही विषय लावून धरले, पण पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राइकच्या वादळात ते विषय वाहून गेले. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी नाही. त्यांचा सेक्युलरवाद मुसलमानधार्जिणा आहे. उलट भाजप इतका राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद कुणाच्याच नसांत नाही हा प्रचार लोकांनी स्वीकारला. प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी मंदिरांचे उंबरठे झिजवले, पण वीर सावरकरांचा अपमान करून त्यांनी देवदर्शनावर पाणी ओतले. सावरकर हे हिंदुत्व, राष्ट्रभक्तांचे देव आहेत. सावरकरांना हे महाशय ‘भगोडे’ व ‘पळपुटे’ म्हणाले. त्याचा सूड मतदारांनी घेतला, पण हेच राहुल गांधी आता पराभवानंतर जबाबदारी झटकून पलायन करीत आहेत. भगोडे बनले आहेत. उत्तर हिंदुस्थानात अमेठीसारख्या गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघात राहुल पराभूत झाले. विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगण्याइतकेही खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले नाहीत. ज्या चार राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत तिथेही काँग्रेस झोपली

हा धक्का मोठा

आहे. राहुल गांधी यांनी निरोप घेताना काही मुद्दे मांडले आहेत. ‘निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने काम केले नाही. कोणत्याही निवडणुका या वृत्तपत्र स्वातंत्र्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि एक पारदर्शी निवडणूक आयोग असल्याशिवाय शक्य नाही. सर्व आर्थिक नाडय़ा, आर्थिक स्रोतावर एकाच पक्षाचा कब्जा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका ‘स्वतंत्र’ पद्धतीने होणार नाहीत.’ राहुल गांधी पुढे सांगतात, ‘‘2019 ची आमची लढाई ही एखाद्या राजकीय पक्षाबरोबर नव्हतीच. आम्ही हिंदुस्थान सरकारच्या संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात एकाकी लढत होतो. या प्रत्येक संस्थेचा वापर विरोधकांना सर्व स्तरांवर खतम करण्यासाठी झाला. देशातील या सर्वच संस्था आजपर्यंत निष्पक्ष असल्याचा उल्लेख गौरवाने होत असे. त्या निष्पक्षतेचा आज अंत झाला आहे. आमची लोकशाही कमजोर पडली आहे. आता सगळ्यात मोठा धोका हा आहे की, जो निवडणूक आयोग देशाचे भवितव्य ठरवत होता तो केवळ एक उपचार उरला आहे.’’ राहुल गांधींची ही खदखद आहे. त्यांनी इतरही बरेच काही लिहिले आहे. देशाच्या सर्व संस्थांवर ‘संघा’चा कब्जा करण्याचे स्वप्न साकार झाल्याची वेदना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. आयएसआयचा कब्जा असण्यापेक्षा संघाचा कब्जा असणे कधीही चांगले. राहुल गांधी यांच्या इतरांवरील पक्षपाताच्या आरोपांचे नंतर पाहू, पण काँग्रेसचे संघटन उभे करणे व लोकांना कामास लावणे याच्या आड तर कोणी आले नव्हते. राहुल गांधींच्या राजीनाम्याचा व त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर केला पाहिजे. काँगेसला एक अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना!