संगमनेरमध्ये वीज वितरणच्या विरोधात काँग्रेसच्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद

mahavitran

अहमदनगर : महावितरण वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केलेल्या रोहित्रांमुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील सुमारे पाच हजार शेतक-यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरुध्द भव्य रास्ता रोको केला. काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला तालुक्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसत होते.

संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगांव फाटा येथे झालेल्या या भव्य रास्ता रोको वेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ आसह पाच हजार नागरिक उपस्थित होते. वडगाव फाटा येथे सुमारे २ तास झालेल्या या आंदोलनामुळे सर्व रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात अनेक शेतकरी वीज वितरणच्या अधिका-यांविरुध्द खूपच आक्रमक झाले होते. यावेळी अधिका-यांच्या मनमानी विरुध्द आवाज उठवितांना अधिका-यांनी माफी मागावी, यासाठी शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांना नियंत्रित करतांना प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.