कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड, सांगलीकरांचा कौल भाजपच्या बाजूने

टीम महाराष्ट्र देशा – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली असून, भाजपनं या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने तब्बल 38 जागांवर विजय मिळविला असून काँग्रेस – राष्ट्रवादीला अवघ्या 24 जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इतरांना 2जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

सांगली महापालिका निवडणुकीच्या ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात उतरले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सांगलीचा गड राखण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. तर सत्तास्थापनेचा निर्धार भाजपनं केला होता.

दरम्यान,जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेश जैन आणि शिवसेनेला हादरा बसला असून या निवडणुकीत ७५ जागांपैकी भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले असून सुरेश जैन यांच्यासाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते. भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास या निकालावरून स्पष्ट झालंय. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय.

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १ ऑगस्टरोजी मतदान झाले होते. या जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार रिंगणात होते. जळगावमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. जळगावमध्ये सुरुवातीला शिवसेना- भाजपा युती झाली होती. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडत सर्व जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही रिंगणात असली तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात होती.या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही.

दरम्यान, मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला.

पिंपरी-चिंंचवड च्या महापौर पदावर पुन्हा एकदा ‘महेशदादांच’ वर्चस्व