fbpx

वंचित बहुजन आघाडीचा कॉंग्रेसने घेतला धसका,आंबेडकरांना केलं जात आहे टार्गेट

prakash-ambedkar-

टीम महाराष्ट्र देशा- वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हा कॉंग्रेसने ही गोष्ट हलक्यात घेतली होती. अतिआत्मविश्वास कॉंग्रेसच्या आता अंगलट येऊ लागला असून भाजप तसेच आघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने कडवे आव्हान निर्माण केले आहे.

आघाडीच्या नेत्यांकडून सुरुवातीला भाजपची बी टीम म्हणून या बहुजन आघाडीला हिणवले गेले मात्र याचा कोणताही परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे समोर येत आहे. सर्व अस्त्र फेल गेल्याने हताश झालेल्या आघाडीकडून आता प्रकाश आंबेडकर यांना टार्गेट केलं जाऊ लागले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा आंबेडकरांना टोला

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत. यातून अप्रत्यक्षरीत्या कोणाला मदत होत आहे, हे जनतेने ओळखावे.  प्रकाश आंबेडकर हे लाखो रुपये खर्च करून सभा घेतात. हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यासाठी यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून, त्यांना कोण आर्थिक रसद पुरवित आहे, असा खोचक सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांना टोला लगावला.

प्रकाश आंबेडकरांनी भाजपची सुपारी घेतली : शिंदे

काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांवर तोंडसुख घेतले आहे,.तसेच एमआयएमसोबत एकत्रित येताना तुमची तत्वं कुठे गेली? असा सवाल देखील सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. प्रकाश आंबेडकरांची आघाडी म्हणजे ‘वोट कटवा’ आघाडी असल्याची टीका त्यांनी केली.

अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या इथं काय काम? : प्रणिती शिंदे

कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या इथं काय काम? असं म्हणत प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.“दुसरे तिसरे कोण ते, अकोल्यावरून आलेत. अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या येथे काय काम? तो येऊन आपल्याला शिकवेल, असं कर तसं कर अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.