६ फेब्रुवारीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

congress & ncp

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी करण्याचे सूतोवाच केल्यानंतर आता आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रितरीत्या लढविण्याची रणनीती दोन्ही पक्षांकडून ठरविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ फेब्रुवारीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, धुळे जिह्यातील जमीन घोटाळा, शेतकरी धर्मा पाटील यांना न्यायासाठी करावी लागलेली आत्महत्या या सर्व पार्श्वभूमीवर सरकारविरोधात आवाज उठविण्याची रणीनीती या बैठकीत आखली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अशीच सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीतही पार पडली होती.

२०१९चा लोकसभा आणि विधानसभा निवडणूकपूर्व आढावा मंगळवारच्या बैठकीत घेतला जाणार आहे. संविधान बचाव रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार या बैठकीला दोन्ही पक्षांतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.