माढ्यात आघाडी राहणार ‘वंचित’; प्रथमच फुलणार कमळ?

करमाळा- माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान २३ एप्रिलला संपल्यानंतर दोन्ही बाजूने चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता अंदाज वर्तवण्यात येत आहेत. राष्ट्रवादीच्या संजय शिंदे विरूद्ध भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांची होत असून माढ्यात आघाडी वंचित राहणार? की पहिल्यांदाच कमळ फुलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढ्याचा तिढा दोन्ही पक्षांकडून सुटल्यानंतर राष्ट्रवादीकडून विद्यमान जि प अध्यक्ष संजय शिंदे तर भाजपकडून साताऱ्याचे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. शिंदे आणि निंबाळकर हे जरी उमेदवार असले तरी माढ्यात मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली.

माढा मतदारसंघातून माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे घोषित केले होते परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे माढ्याचा तिढा आणखी वाढला होता तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील माढ्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक होते परंतु राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप मध्ये प्रवेश केला.

तर राष्ट्रवादीने माढ्यातून ऐनवेळी सध्याचे भाजप पुरस्कृत जि प अध्यक्ष संजय शिंदे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली आणि माढा लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली. मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून संजय शिंदे यांची ओळख आहे त्यांची आणि मोहिते-पाटील यांचे राजकीय वैर्य सर्व जिल्ह्याला माहिती असल्यामुळे माढा लोकसभेला रंगत वाढलेली होती.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणू असे सांगितले होते. अपेक्षेप्रमाणे साताराचे कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर झाली.आणि माढ्यात उलटसुलट चर्चेला ऊत आला.
दुसरीकडे माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २००९ साली माढ्यातून शरद पवार विजयी झाले होते तर २०१४ ला मोदी लाट असूनही विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते त्यांनी सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव केलेला होता. आता परिस्थिती वेगळी असून कुठल्याही परिस्थितीत माढा लोकसभा जिंकणार असल्याचे शरद पवार सांगत आहेत.

माढ्यातून राष्ट्रवादी पराभूत झाली तर राष्ट्रवादीला सोलापूर जिल्हातून खूप मोठे खिंडार पडेल अशी भिती सध्या त्यांच्यावर आहे. तर संजय शिंदे राष्ट्रवादीकडून निवडून आले तर सोलापूर जिल्हात त्यांचा दबदबा वाढेल त्यामुळे संजय शिंदे यांना निवडणूकीत पराभूत करण्यासाठी मोहिते-पाटील यांनी कंबर कसलेली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात लढाई जरी शिंदे आणि निंबाळकरांची असली तरी पवार आणि मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागलेली आहे.

सध्या माढ्यात संजय शिंदेना रोखण्यासाठी भाजप कडून कोंडी झालेली आहे. माढा मतदारसंघात समावेश असलेल्या मान विधानसभेचे आमदार जीवन गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे तसेच कॉंग्रेसचे कल्याणराव काळे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढलेली असून माढ्यात प्रथमच कमळ फुलविण्यासाठी भाजपने चांगलीच फिल्डींग लावलेली सध्या दिसून येत आहे.

सध्या करमाळ्यातून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील माढ्यातून आमदार तानाजी सावंत तसेच सांगोलातून माजी आमदार शहाजी पाटील, यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मताधिक्क मिळवून देण्यासाठी कंबर कसलेली आहे तर पंढरपूर तालुक्यातील सुमारे ५२ गावांचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात आहे तेथून विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक तर कल्याणराव काळे यांनीही निंबाळकर यांना निवडून येण्यासाठी चांगलीच फिल्डींग लावलेली सध्या दिसून येत आहे.

सध्या माळशिरस तालुक्यात भाजपचे वातावरण चांगले झालेले आहे एकेकाळी कट्टर विरोधक असालेले उत्तम जानकर आणि मोहिते-पाटील सध्या एकत्रित असल्यामुळे याचा फायदा भाजला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला सध्या कोंडीत पकडण्याची समिकरणे सध्या माढ्यात सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढ्यात आघाडी वंचित राहणार की प्रथमच कमळ फुलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.