सांगली महापालिकेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी शक्य?

Congress-NCP alliance for Sangli municipality possible?

सांगली : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकारचा कारभार पाहता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ सांगली महापालिका निवडणुकीतच नव्हे, तर राज्य पातळीवरील सर्वच निवडणुकीत एकत्र यावे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी केले.

अवघ्या आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन बांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कामकाजाबाबत सध्या सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे. वास्तविक, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत पदाधिकार्‍यांचा बेबनाव झाल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. त्यात लवकरच सुधारणा झालेली दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम यांची महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रविंद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच सर्वांची व्यापक बैठक घेऊन समेट घडवून आणला जाईल. महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे.

याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ आमच्यापेक्षा निम्मेही नाही. महापालिका क्षेत्रात भाजपची ताकद नाही. तरीही समविचारी या दोन्हीही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आल्यास महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी झालेली दिसेल. अन्यथा, कॉंग्रेस पुन्हा एकदा स्वबळावर महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यास आजही सक्षम आहे, असा दावाही विश्‍वजित कदम यांनी केला.