fbpx

वाचा सविस्तर ; विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केलंय. विखेंनी मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असं अब्दुल सत्तार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमधून आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. यातूनच काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. देशात लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आहे.एकीकडे लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नसून, दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पाच आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभेतील काँग्रेसचे सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नीतेश राणे आणि जयकुमार गोरे हे या आठवड्यात काँग्रेसला रामराम करतील, अशी माहिती मिळते आहे. त्यापैकी काही जण लगेचच भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पक्षांतरविरोधी कायद्याप्रमाणे यांना आमदारकी सांभाळून दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा दिला जाईल आणि ते पक्षातून बाहेर पडतील, अशी शक्यता आहे.