काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पवारांसोबत खलबतं; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली वाढल्या !

congress and sharad pawar

नवी दिल्ली : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.

संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली.

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सद्या औरंगाबादच्या नामांतरावरून बाळासाहेब थोरात यांनी विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता थोरात प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, मंत्री विजय वडेट्टीवार आदी नेत्यांची नावे शर्यतीत आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर अजूनही थोरात हे कायम आहेत. मात्र, नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडी बाबत अजूनही ठाम निर्णय झालेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली आहे. मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांनी पवारांची भेट घेतली आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या विजय वडेट्टीवार यांना घेऊन अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी कांग्रेस मधील बदलावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजत आहे. तब्बल पाऊण तास या नेत्यांमध्ये खलबतं झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या