पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का , ‘या’ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

bjp flag

पुणे, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपाची ताकद आणखी वाढल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग आणखी सुखकर झाल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारासाठी आले असताना त्यांच्या उपस्थितीत खासदार संजय काकडे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली या ताकदवर स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी शिवाजीनगर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे व पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. या प्रत्येक नेत्यांच्या मागे त्यांची हक्काची मते आहेत. त्यामुळे पुण्यातील कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपाची ताकद आता आणखी वाढली आहे. परिणामी भाजपाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास, भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. विकासाचे राजकारण करताना महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. दूरदृष्टीकोन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे आखली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊन सामाजिक समतोल साधण्यात फडणवीस यशस्वी ठरले. शेतीला पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली. मुंबई, पुणे व नागपूर शहरांत मेट्रोचं जाळं अधिक वेगानं निर्माण केले.

आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासन नेतृत्वाला स्वीकारून पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंटमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवक आणि नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदार संघातील या नेत्यांच्या भाजप प्रवेशाने आता सर्व राजकीय गणिते बदलली असून त्याचा परिणाम निवडणूक निकालात नक्कीच पाहायला मिळेल.