काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ब्र अक्षरही काढत नाहीत! : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र देशा : आता लोकशाही जपण्यासाठी काँग्रेसचे नेते गळा काढत आहेत. मात्र आणीबाणीबद्दल ब्र अक्षरही काढत नाहीत.काँग्रेस किंवा त्यांच्यासारखे पक्ष हे संविधानाबाबत बोलतात. मात्र संविधानाला सर्वात मोठा धोका काँग्रेसपासूनच आहे असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

इंदिरा सरकारने आणीबाणी लादली आणि लोकशाहीचा स्तंभ मानला जाणाऱ्या माध्यमांचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ज्यांनी याविरोधात आवाज उठवला त्या सगळ्यांना तुरुंगात धाडण्यात आले. अनेक अन्यायकारक निर्णय त्या काळात घेतले गेले, तेव्हा कुठे गेली होती लोकशाही? असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारले.

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणीबाणी विरोधात देशभरात आज काळा दिवस म्हणून पाळणार आहे. गेल्या 43 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. हा निर्णय देशातील लोकशाहीवरील घाला होता, अशी टीका करत आणीबाणी विरोधात भाजपाने काळा दिवस पाळणार आहे. आणीबाणी हा देशातला सर्वात मोठा लोकशाहीला मारक असलेला निर्णय होता. आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील काळा कालखंड आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तेव्हाच्या परिस्थितीचे वर्णन सुरेश भट यांनी अगदी योग्य शब्दात केले होते असे त्यांनी सांगितले. ”उभा देश झाला आता एक बंदीशाळा, इथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली” या ओळी सुरेश भट यांनी लिहिल्या त्या देशातील आणीबाणीवरच होत्या. जनजागृतीच्या मशाली खरोखरच पेटल्या आणि संविधान वाचले. आज काँग्रेस पक्ष संविधान वाचवा, देशात हुकुमशाही राजवट आहे अशी बदनामी करत असतात. मात्र तेव्हाच्या परिस्थितीबाबत काहीच का बोलत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.