उमेदवारी जाहीर होऊ देत; मग भाजप – शिवसेनेतील गर्दी कशी ओसरते बघा – पाटील

patil

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीला जोरदार गळती लागली आहे. पक्षातील जेष्ठ नेत्यांनी अडचणीच्या काळामध्ये दोन्ही कॉंग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे राज्यामध्ये विरोधी पक्षांचे अस्थित्वचं धोक्यात आले आहे. दुसरीकडे मात्र कॉंग्रेस नेते आपल्या कार्यकर्त्यांना नव्याने लढण्यासाठी धीर धरण्यास सांगत आहेत.

कोल्हापूरमधील कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाजप – शिवसेनेतील नेत्यांची गर्दी ओसरण्याचे भाकीत वर्तवले आहे. अनेक लोक भेटायला येत असून, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला आहे. अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याने लवकरच नवीन अध्याय सुरु होईल, असंही पाटील म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसमधील जागा वाटप निश्चित झाले आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर आघाडी आणखीन भक्कम होईल. असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.