काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांचे कोरोनाने निधन

रायगड : महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे रविवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. आज महाड येथे दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव कॅप्टन जगताप बंगला, नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जगताप यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

माणिकराव जगताप यांची कारकीर्द
विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले . परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले होते.

सत्यजित तांबे यांनी वाहिली श्रध्दांजली
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. ते म्हणतात की, “आमचे मार्गदर्शक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माज़ी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन झाले आहे. मी जगताप परीवाराच्या विशेषत: त्यांची कन्या आमची बहिण महाडची नगराध्यक्षा स्नेहल व चिरंजीव श्रीयश यांच्या दुःखात सहभागी आहे.”

जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला-नाना पटोले
माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. माणिकराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या