शिवसेनेच्या धनुष्यबाणात अडकला काँगेसचा आणखी एक हात

टीम महाराष्ट्र देशा:-विधानसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहे. त्यातच पक्ष प्रवेशाची मोठी लाट सुरु आहे. आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. निवडणुकीच्या तोंडावर भाजपप्रमाणे शिवसेनेतही मोठ्या प्रमाणत इनकमिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीला आता अगदी कमी कालावधी बाकी असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे राज्यसचिव विजय पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. विजय पाटील वसई विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.

विजय पाटील हे वसईतील प्रभावी राजकीय नेते आहेत. आग्री, वाढवळ, ख्रिश्चन समुदायांचा त्यांच्या पाठीशी चांगला जनाधार असल्याचंही बोललं जातं. पाटील हे वसईतील उद्योजक आहेत. त्यांना स्वच्छ प्रतिमेचा राजकीय चेहरा असंही बोललं जातं.शिवसेना देखील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी विजय पाटलांना वसई विधानासभेतून लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वसई विधानासभेतून स्वतः हितेंद्र ठाकूर, तर नालासोपारा विधानासभेतून त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर आमदार आहेत. बोईसर मतदारसंघातूनही हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे विलास तरे हेच आमदार होते. मात्र, मागील आठवड्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ठाकुरांना धक्का दिला.

दरम्यान शिवसेनेकडून विरोधी उमेदवारांना शह देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नालासोपारा विधानासभेत विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांना शह देण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी वसई विधानसभा मतदारसंघातून विजय पाटील आणि श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पंडित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.