घरकुल घोटाळयाप्रकरणी कॉंग्रेस नेत्याला ठोकल्या बेड्या

टीम महाराष्ट्र देशा : दोंडाई येथील घरकुल घोटाळयाप्रकरणी कॉंग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे. हेमंत देशमुख काही दिवस अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आदेशनुसार अटक करण्यात आली आहे.

दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख, 3 तत्कालीन माजी नगराध्यक्ष आणि 3 तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर 2016 साली दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नंतर झालेल्या तपासात माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास 15 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे उघडकीस आले.

तसेच घरकुल योजना राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे रामराख्या सदस्य होते. म्हणून त्यांना देखील महिन्यात अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांना कोर्टाने अद्याप जामीन दिलेला नाही, याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली. गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून 3 नगराध्यक्ष , 3 मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरत्या जामीनावर आहेत.