काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

congress vs uddhav thackeray

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नाना पटोले यांच्या हाती सोपवल्यापासून काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीपासून ते बड्या नेत्यांपर्यंत अनेकदा नेत्यांची फोडाफोडी सुरु असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतील नगरसेवक फोडल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी वर्तवली होती. यानंतर देखील आघाडीतीलच पक्षांमध्ये नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्षबदलाचे प्रकार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता काँग्रेसने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेचे उपनेते, तीन वेळा आमदार राहिलेले आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवबंधन सोडून त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तीन वेळा ते आमदार होते. तर, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशोक शिंदे यांना राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं.

२०१४ मध्ये शिवसेना, भाजप वेगळी लढली असता भाजप उमेदवाराने त्यांचा प्रभाव केला होता. मागील काही दिवसांपासून ते शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे व वरिष्ठ नेतेमंडळींकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने, नाराज होते असं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या