काँग्रेस मनामनात, घराघरात नाही तर फक्त काँग्रेस भवनात

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणायचेच, या हेतूने शिवसेनेने ‘शिवसंपर्क’ अभियान राबविले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘संवाद यात्रे’ला सुरवात केली. दुसरीकडे, काँग्रेसने ‘काँग्रेस मनामनात अन् घराघरात’ हे अभियान हाती घेतले आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत त्याची सुरवात झाली. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत गर्दी होणार नसल्याने गणेशोत्सवाचे कारण पुढे करून ते अभियान सध्या कॉंग्रेस भवनातच सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत करून मोदी लाटेत महापालिकेचा गड भाजपने जिंकला. अनेक वर्षे विरोधी पक्षात बसलेल्या भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी शहरातील नागरिकाना एक-दोन दिवसांआड पाणी देऊ, स्मार्ट सिटीतून शहराचा विकास करू अशी विविध आश्वासने दिली. मात्र, नागरिकांचा अपेक्षा भंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

शहरात ना समांतर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला ना शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळाले. सध्या शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. कोणताही नवा उद्योग सुरू व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपने प्रयत्न केला नाही. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेने सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे.

दरम्यान, भाजपचे माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने त्यांचे अभियान सुरू केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली.

महत्त्वाच्या बातम्या