दक्षिणेची स्वारी कॉंग्रेसला तारी, कठीण काळात कॉंग्रेसला उभारी देणारा दक्षिण भारत

sonia-gandhi-rahul-gandhi

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, राहुल हे अमेठीसह वायनाडमधून लढणार असल्याने दक्षिण भारतात कॉंग्रेसला नवीन उभारी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आज राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वायनाडमध्ये उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

वायनाड हा अल्पसंख्याक समाज बहुल असणारा लोकसभा मतदारसंघ आहे. गांधी यांना मुस्लीम लीगने देखील पाठींबा दिला आहे. दरम्यान, आजवरचा इतिहास पाहता कॉंग्रेसच्या कठीण काळात दक्षिण भारताने पक्षाला नवीन उभारी दिली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी देखील यापूर्वी दक्षिणेतून निवडणूक लढवली आहे. आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सपाटून पराभवाचा सामना करावा लागला होता, तसेच खुद्द इंदिरा यांना देखील पराभव पत्करावा लागला होता, पुढे १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगलूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधी यांनी लढत विजय मिळवला होता.

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील १९९९ मध्ये कर्नाटकातील बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून लढत देत विजय मिळवला होता. १९७७ आणि १९९८ च्या कॉंग्रेस पडझडीत दक्षिणे भारतानेच कॉंग्रेसला उभारी घेण्यास मदत केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी हे देखील वायनाडमधून विजय मिळवत कॉंग्रेसला अच्छे दिन आणणार का, हे काळच ठरवेल.