नगरमध्ये राष्ट्रवादीपेक्षा आमची परिस्थिती चांगली, आमच्यकडे निवडून येणारा उमेदवार – चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडीचं सूत्र जवळपास निश्चित झालं असलं तरी अहमदनगरसाठी घोडं अडलेलं दिसतंय. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आमची परिस्थिती चांगली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादीकडूनही या जागेसाठी रस्सीखेच चालूच आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. यात राज्यातील 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर उमेदवार कोण असावेत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघात निश्चित केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवू. तिथे उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय होईल. चेहरा बदलण्याची गरज असेल तिथे चेहरा बदलला जाईल, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

मुंबईतील दोन-तीन जागांवर चर्चा व्हायची आहे. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे आमची परिस्थिती राष्ट्रवादीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे, असं म्हणत नगरच्या जागेसाठी रस्सीखेच होणार याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिलेत.