लखीमपूर खेरी प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. लखीमपूर हिंसाचारातील पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा, या मागणीचं निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या भेटीसाठी केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली होती.

काँग्रेसकडून लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीचे पिता असल्यानं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ पदावरुन हटवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. राहुल गांधींसह प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलामनबी आझाद, ए.के.अँटनी या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी मिश्रा केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदी असल्यानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं अशक्य असल्याचं सांगत त्यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची पीडितांची मागणी राष्ट्रपतींसमोर मांडल्याचं प्रियंका गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलंय की, लखीमपूर खिरीमधील दोषींवर कारवाई व्हायला हवी, न्याय मिळायला हवा, ही गोष्ट आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना सांगितली. आम्ही त्यांना सांगितलं की ही मागणी फक्त कुटुंबियांची नाहीये तर देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे. देशातील शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं की, जोवर हा व्यक्ती मंत्री आहे, तोवर न्याय मिळू शकत नाही. त्यांना मंत्रीपदावरुन हटवलं गेलं पाहिजे. ज्याने हत्या केलीय, त्याला अटक होऊन कारवाई व्हायला हवी.

महत्वाच्या बातम्या