…तर भाजपने महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेंना देखील उमेदवारी दिली असती : कॉंग्रेस

bjp vr congress

टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्वच समाज स्तरातून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा निषेध होऊ लागला तर विरोधकांनी देखील सत्ताधारी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. आता भाजप मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना उमेदवारी देत असेल तर महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असते, तर त्यांना देखील भाजपने तिकीट दिले असते, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

याबाबत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, भाजप बेशरमपणे साध्वी सारख्या व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. मात्र जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, असंही सावंत यावेळी म्हणाले. तसेच एवढा विरोध झाल्यानंतरही प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी कायम राखल्यामुळे भाजपकडून दहशतवादाचे समर्थन करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असा टोलाही सावंत यांनी लागवला आहे. तर महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असते, तर त्यांना देखील भाजपने तिकीट दिले असते असे देखील ते यावेळी म्हणाले.

साध्वीच्या करकरे यांच्या बाबतच्या बेलगाम वक्तव्यानंतर देशातून साध्वी प्रज्ञासिंहचा निषेध करण्यात आला असून साध्वीची उमेदवारी भाजपने रद्द करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र भाजपने याकडे कानाडोळा केला असून हेमंत करकरे यांच्या बाबतीतले साध्वीचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे स्पष्टीकरण भाजप कडून देण्यात आले. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंहला भाजपकडून लोकसभेला उमेदवारी देण्यात आली असून कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह सिंह यांच्या विरोधात ती लढणार आहे.