पाणी गळतीविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाला कॉंग्रेस नगरसेवकाच्या मुलांची मारहाण

धुळे- धुळे मनपात नळ गळतीची तक्रार करणा-या एका तरुणाला काँग्रेसचे नगरसेवक इस्माईल पठाण यांच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी मनपाच्या आवारात मारहाण केली. ही हाणामारी फ्री-स्टाईल झाल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलीसांनी वेळीच धाव घेवून नगरसेवक पुत्रांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की शहरातील देवपूरातील प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेसचे नगरसेवक इस्माईल पठाण यांच्या भागातील रहिवासी तैसिफ खाटीक याने आपल्या घराजवळील एका नादुरुस्त नळाच्या आणि पाणी गळतीचा व्हिडीओ सोशल मिडीयावरुण इतर नागरिकांपर्यत पसरविला. तसेच तो व्हिडीओ नगरसेवक इस्माईल पठाण यांना देखील पाठवण्यात आला. याबाबत तक्रारदार तौसिफ खाटीक यांना विचारणा पठाण यांनी केली असता पाणी गळतीवरुण संताप व्यक्त करुण नगरसेवक पठाण यांच्याशी वाद घालत असतांना अचानक पठाण यांचे तीनही मुले मनपात होते. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी तौसिफ खाटीक यांना मारहाण करण्यात सुरुवात झाली आणि मनपाच्या आवारात गोंधळ झाला.

यावेळी तात्काळ इतरांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला. मात्र त्याचवेळी शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल होवून त्यांनी तक्रारदार तौसिफ खाटीक व नगरसेवक इस्माईल पठान यांच्या तीनही मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीसांनी वाद घालणा-यांना तंबी देवून सोडून दिले आहे.