fbpx

विधानसभेला कर्जतवर कॉंग्रेसचा दावा ? जिल्हाध्यक्ष पद देत केली साखरपेरणी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब साळुंके यांच्या रूपाने कर्जत तालुक्याला प्रथमच जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे या जागेवर कॉंग्रेसचा हक्क असल्याने ते या जागेवरील दावा करणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

तत्कालीन जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड केली. त्यांना शनिवारी संगमनेर येथे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

बाळासाहेब साळुंके यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्याला प्रथमच हे पद मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. यानिमित्ताने तालुक्यात कॉंग्रसला उभारी मिळून आपल्या पारंपारिक मतदार संघात त्यांना ठामपणे दावा ठोकता येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड येथून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र, आता कॉंग्रेसने कर्जतला जिल्हाध्यक्षपद देत विधानसभेची साखरपेरणी केली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या मिशन विधानसभेला जोरदार धक्का बसला आहे.

तर मागील २०१४च्या विधानसभा निवडणुका भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढवल्या होत्या. त्यामुळे त्या वेळी ज्या पक्षाने जी जागा जिंकली असेल, त्याच पक्षाकडे ती जागा ठेवण्याचे आघाडीने ठरवले असल्याचे समजते. त्यानुसार नगर शहराची काँग्रेसची जागा आता राष्ट्रवादीचा आमदार असल्याने राष्ट्रवादीकडेच राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर नगरची जागा राष्ट्रवादीला दिल्याने कर्जत-जामखेडची जागा काँग्रेसलाच राहिली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांकडून मांडली जात आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडून याच एकमेव जागेची रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत.