fbpx

लोकसभेत वंचित आघाडीमुळेचं कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पडले : लक्ष्मण माने

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर या निवडणुकीला कॉंग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडे 50 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दिली आहे. तसेच प्रकश आंबेडकर यांनी देखील महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीसोबत यावे असे आवाहन लक्ष्मण माने यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी लक्ष्मण माने म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. तर भाजपचे उमेदवार विजयी झाले. म्हणूनचं वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला. तसेच राजीनामा देतेवेळी प्रकाश आंबेडकर यांनादेखील राजीनामा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही स्वतंत्र महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली, असे माने म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडे 50 जागांची मागणी केली आहे. त्यापैकी पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूरमधून 4, कोल्हापूर 2, सांगली 1, पुणे 4 तर सातारा जिल्ह्यातून फलटणची एक जागा मागितली आहे. याबाबत लवकरच पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांच्यासोबत बैठक होऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.