‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुढची ४० वर्षे विरोधी पक्षातचं राहणार’

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. ही यात्रा सध्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील अकोले येथे महाजनादेश यात्रेचे सभा पार पडली. या सभेला नुकताच भाजप प्रवेश केलेले मधुकर पिचड, वैभव पिचड राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील जेष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी विरोधी आघाडीतील नेत्यांना पुढची ४० वर्षे विरोधी पक्षातच रहावे लागणार आहे. आघाडीला आता विरोधी पक्षनेता निवडून आणता येणार नाही असं विधान करत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर महायुतीच येणार असून निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

पुढे बोलताना फडणवीस यांनी ‘ज्यांना सत्तेची संधी मिळाली त्यातील काही नेत्यांमध्ये माजोरी व मुजोरी होती म्हणून जनता दुर गेली, आता मात्र पुन्हा संधी नाही असं विधान केले आहे. दरम्यान भाजप प्रवेश केलेले वैभव पिचड हे अकोल्याचे आमदार होते. त्यामुळे या मतदारसंघात आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या सर्वच्या सर्व महणजे १२ जागा जिंकून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते कितपत यशस्वी होतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.