fbpx

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुण्याचा उमेदवार सोडला वाऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीदरम्यान प्रचारसभा, मेळावे, आश्वासने, नेत्यांची धावपळ, कार्यकर्त्यांची लगबग या सर्व गोष्टी घडत असतात. परंतु निवडणुकीची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, तरीही पुण्यात कॉंग्रेसकडून म्हणावं अशा प्रचाराला सुरुवात झालेली दिसत नाही.

पुणे लोकसभेसाठी मोहन जोशी हे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आहेत तर गिरीश बापट हे भाजपचे उमेदवार आहेत. गिरीश बापटांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत प्रचारात आघाडी घेतली आहे. बापट हे वेगवेगळ्या विभागांचे दौरे करत आहेत. तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा घेत आहेत.

दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचाराच्या तोफा अद्यापही थंडच आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पुण्यात अद्यापही एकाही स्टार प्रचारकाची सभा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुणे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसच्या या भूमिकेमुळे मोहन जोशींना फटका बसण्याची शक्यता आहे.

सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत त्यामुळे त्यांनीही पुण्याकडे पाठ फिरवली आहे. पुण्यात अद्याप एकही सभा न झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कॉंग्रेसचे स्टार प्रचारक असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांची काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद झाली होती. याच्या व्यतिरिक्त अजूनही एकाही बड्या नेत्याने पुण्यात हजेरी लावलेली नाही त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.

या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर कॉंग्रेसतर्फे बड्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या यामध्ये प्रणव मुखर्जी, दिग्विजय सिंग, पी.चिदंबरम, शशी थरूर यांचा समावेश होता. यावेळी मात्र प्रचाराचं वारं थंडच आहे.