कॉंग्रेसला चंद्राबाबूंची साथ; काँग्रेस आणि जेडीएसचे सर्व आमदार हैदराबादमध्ये

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.

दरम्यान अशा परिस्थितीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यता असून, काँग्रेस आणि जेडीएसला आपले आमदार फुटण्याची भीती असल्याने त्यांनी आपल्या आमदारांची रवानगी राज्याबाहेर केली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि जेडीएस युतीचे सर्व आमदार सध्या हैदराबादमध्ये असून, त्यासाठी काँग्रेसला चंद्राबाबू नायडू मदत करत असल्याचं वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांनीही त्यांच्यासाठी सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे. एसआरएस आणि ऑरेंज ट्रॅव्हल्सच्या बसगाडय़ांमधून आमदार हैदराबादला पोहोचले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याने दोन्ही पक्षाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.