नेत्यांनंतर मित्रपक्षही सोडतोय कॉंग्रेस आघाडीची साथ

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाला निवडणुकीच्या आधीचं धक्के बसत आहेत. अनेक विश्वासू आणि ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. मात्र आता कॉंग्रेस – राष्ट्रवादीला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजेंद्र गवई यांच्या रिपाई पक्षाने कॉंग्रेस आघाडीला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी राजेंद्र गवई म्हणाले की, अचलपूर आणि दर्यापूरची जागा दिली नाही तर कॉंग्रेस आघाडी बरोबर चर्चा करणार नाही. गवई यांनी आघाडीकडे 10 जागांची मागणी केली आहे. परंतु अचलपूर आणि दर्यापूर या दोन जागांवर तडजोड नाही. या जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू, मग आम्हाला भाजपची ‘बी’ टीम म्हणू नका, असेही राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे.राजेंद्र गवई प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याची इच्छा राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार, असेही ते म्हणाले. वंचित आघाडीने आघाडीसोबत निवडणूक लढवाव्यात, त्यांचे उमेदवार निवडून येतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान राज्यात यंदा छोटे पक्ष मोठ्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आणताना दिसत आहे. कारण छोटे पक्ष देखील निवडणुकांमध्ये मतांची मोठी कमाई करत आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मतं मिळवली होती. वंचितच्या मतांचा फटका प्रत्यक्ष कॉंग्रेस आघाडीला बसला होता. त्यामुळे कॉंग्रस आघाडीने छोट्या पक्षांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला आहे.