मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर बंदी घालण्याच्या २४ तासांतच काँग्रेसचे आंदोलन

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी नागरिकांशी संवाद साधताना कोणत्याही पक्ष संघटनेने आंदोलन करू नये, असं आवाहन केले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्र्यांच्या वतीने तसं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, या आवाहनाला अवघे 24 तासही उलटले नसताना औरंगाबाद शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार सदर आंदोलन करण्यात आलं असल्याचं काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी सांगितलंय. यावरून महाविकास आघाडीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आलाय.

राज्यामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोणीही गर्दी करू नका आणि नियमांचे पालन करा असे आवाहन वारंवार करण्यात येतंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार नागरिकांना तसं आवाहन करत आहेत. मात्र सर्वसामान्यांना लागू होणारा हा नियम, राजकीय पक्षांना आणि नेत्यांना लागू होत नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेल्या विविध सभा असो किंवा जयंत पाटील यांनी काढलेली यात्रा असो. या ठिकाणी होणारी गर्दी पाहता कोरोनाला आमंत्रण देतोय की काय? असाच प्रश्न निर्माण होतो.

त्यात भर म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देखील काँग्रेसच्यावतीने आंदोलन रद्द करण्यात आले नाही. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असतांना राष्ट्रवादी आणि शिवसेना वगळता काँग्रेसने कायमच वेगळी भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये आगामी काळात महानगरपालिका निवडणुका आहेत. यामध्ये काँग्रेसचे नेते मंडळी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा करत आहे. त्याचीच तर ही नांदी आहे का? असा प्रश्न पडतो.

महत्वाच्या बातम्या