महाविकास आघाडीत संघर्ष अटळ ? मुंबईत काँग्रेस ‘इतक्या’ जागा लढण्यावर ठाम !

mahavikas aghadi bighadi

मुंबई : राज्य सरकारने नुकताच प्रभाग पद्धती बाबतचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. तर, मुंबईत केवळ एक सदस्याचा वॉर्ड असेल, असे राज्य सरकारने जाहीर केलं आहे. यामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

आघाडी-युतीची समीकरणे बदलल्यानंतर महत्वाच्या महापालिकांची होणारी ही पाहिलीच निवडणूक असल्याने जनता काय कौल देणार हे महत्वाचं ठरणार आहे. तर, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष युती आणि स्वबळ याबाबत वेगवेगळी भूमिका घेत असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भूमिका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी लावून धरल्याचे समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष या निवडणुकांमध्ये एकमेकाला भिडणार असं चित्र सध्यातरी दिसत आहे.

भाई जगताप यांच्या उपस्थितीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक आज संपन्न झाली. यावेळी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव आणि पालकमंत्री अस्लम शेखही उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीचं गणित, निवडणुकीचा आराखडा समजावून सांगितला. तसेच मुंबई जिंकण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी काय केले पाहिजे याच्या सूचनाही दिल्या. यावेळी त्यांनी आम्ही  सर्वच्या सर्व 227 जागा लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या