पाण्याने लावली भाजपमध्ये आग

conflict pune bjp

पुणे: पुणे शहरासाठी अत्यंत महत्वाची असणारी 24 तास समान पाणी पुरवठा योजनेच्या प्रारंभीच मिठाचा खडा पडला आहे. योजनेसाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी संगनमत केल्याच्या कारणाने गुरुवारी ही निविदा रद्द करण्यात आली. निविदा रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेतील भाजप पदाधिकारी यांनी जीएसटी लागू झाल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवणार असल्याचे सांगितले तसेच हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र भाजपचे सहयोगी खासदार असणारे संजय काकडे यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे सांगितले आहे. तसेच हा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्याचे सांगणारे पालिकेतील भाजप पदाधिकारी बावळट असल्याचा घरचा आहेर दिला आहे

संजय काकडे यांच्या विधानामुळे आता पुणे भाजपमधील नेत्यांसह कार्यकर्त्याचाही तिळपापड झाला आहे. ‘संजय काकडे हे आमचे नेते नसून काल पक्षात आलेल्यांनी पदाधिकाऱ्यांना शिकवू नये’ असे प्रत्युतर स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी दिले आहे. तसेच कोणाचा रस कशात आहे हे सर्वाना माहित असून पक्षाच्या मिटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगायलाही मोहोळ विसरलेले नाहीत.

मुरली मोहोळ यांच्या सोबतच भाजपमधील इतर पदाधिकारीही काकडे यांना ‘काल आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये’चा नारा देत आहेत. या बाबाद्च्या जोरदार चर्चा सध्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या व्हाटस्अप ग्रुपवर तसेच सोशल मिडीयावर सुरु आहेत.

एकंदरीतच पाहता पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ज्यांच्या मदतीने भाजपला आपली सत्ता काबीज करता आली ते सहयोगी खासदार संजय काकडे आता स्थानिक भाजप नेत्यांना नकोसे झाल्याच चित्र दिसत आहे.

काय म्हणाले होते खासदार संजय काकडे
समान पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या वाढीव निविदा रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यानी घेतला आहे. मात्र महापालिकेतील पदाधिकारी जर हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला असे म्हणत असतील तर पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत अशी टीका
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली होती.