साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये तुफान राडा; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

udyanraje bhosle & shivendraraje

वेबटीम : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. याचेच चित्र काल साताऱ्यात पहायला मिळाल. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री तुफान राडा झाला आहे. आणेवाडी येथील टोलनाक्यावरून दोन्ही राजेंचे कार्यकर्ते भिडले असल्याची माहिती समोर आली आहे. तर खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. दोघांची निवासस्थाने असलेल्या परिसरात कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

दोन्ही राजेंच्यामध्ये असणारा वाद काही नवीन नाही. मात्र, आता कारण आहे ते आणेवाडी येथील टोल नाक्याचे. गेली १२ वर्षे झाले हा टोलनाका उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होता. मात्र रिलायन्स कंपनीने हा टोलनाका आता शिवेंद्रराजेंच्या समर्थकांना दिला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे उदयनराजे हे चांगलेच संतापले होते. काल रात्री हा टोलनाका आमदार शिवेंद्रराजे समर्थकांच्या ताब्यात जाणार असल्याने खा. उदयनराजे भोसले हे स्वत: संध्याकाळी सात वाजल्यापासूनच टोलनाक्यावर थांबले होते. दरम्यान शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते टोलनाक्यावरून जात असताना उदयनराजेंच्या समर्थकांसोबत त्यांची बाचाबाची झाली.

उदयनराजे भोसले यांनी त्या कार्यकर्त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही होतेच. शिवेंद्रराजे यांच्या सुरुची बंगल्यापर्यंत हा पाठलाग करण्यात आला, ज्यानंतर राडा आणि दगडफेक सुरु झाली आणि वाद आणखी चिघळला. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनीही स्वतः दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे.