द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध: आ. सुभाष देशमुख

सोलापूर : दुष्काळ त्यानंतर अवकाळी पाऊस आणि कोरोना यामुळे द्राक्ष बागायत उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र त्यांनी खचून न जाता या संकटाशी मुकाबला करावा,  त्यांना ज्या अडचणी येणार आहेत त्या सोडविण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन आणि आपण सदैव कटिबद्ध आहोत. त्यामुळे द्राक्ष बागायतदार उत्पादकांनी खचून न जाता या संकटाशी मुकाबला करावा,  असे आवाहन सोलापूर सोशल फाऊंडेशन चे मार्गदर्शक आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

आमदार सुभाष देशमुख यांनी रविवारी सकाळी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांशी कॉल कॉन्फरन्स वर संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.

यावेळी जवळपास शंभर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगून त्या सोडविण्याची मागणी आमदार देशमुख यांच्याकडे केली. गेल्या एक-दोन दिवसात पाऊस पडल्यामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले आहे. याशिवाय द्राक्षाला म्हणावा तसा भावही मिळत नाही,  त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले तर तर बेदाणा प्रक्रिया साठी लागणारे साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध नसल्यामुळे अडचण होत असल्याचे अनेक अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आले. ज्या ठिकाणी द्राक्षे उपलब्ध आहेत त्या ठिकाणांहून बाजारात नेताना गाडीची व्यवस्था नाही,  गाडीची व्यवस्था झाली तर पोलिस  अडवतात त्यामुळे जागेवरच माल त्यामुळे  पडून असल्याचे अनेक शेतकऱ्याने बोलून दाखवले.

मंगळवेढा येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांनी ज्या ठिकाणी रिकामे शेड आहेत त्या ठिकाणची जागा द्राक्ष उत्पादकांना उपलब्ध करून द्यावी. यामध्ये कृषी विभागाने लक्ष घालावे,  अशी मागणी केली. उचेठाण येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी सध्या गावाकडे 15 ते 18 रुपये किलोने विकला जात आहे,  त्यामध्ये आडत आणि कमिशन द्यावे लागते त्यामुळे किलोला केवळ 12 ते 13 रुपये भाव मिळतो,  त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे सांगत आमदार देशमुख यांनी पुढाकार घेत परराज्यातील एजंटांची बैठक घेत एक फिक्स भाव  ठरवावा  तसेच सोलापूर सोशल  फाउंडेशनने  वायनरी प्रकल्प सुरू करावा अशीही मागणी  केली.

कासेगाव येथील शेतकरी सुरेश देशमुख यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सौदे नाही त्यामुळे माल जागेवर पडून आहेत तरी त्वरित सौदे सुरू करण्याची मागणी केली. या कॉल कॉन्फरन्स मध्ये पेनुर येथील धनाजी पुजारी,  उळेगाव येथील विलास डांगे,  आढीव येथील बाळासाहेब चव्हाण,  भाऊसाहेब तरंगे,  धर्मराव रामपुरे,  धनाजी गरड,  अरविंद पाटील,  चंद्रकांत चव्हाण यासह शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार देशमुख यांच्या पुढे मांडल्या. यावेळी ज्या आडचणी आहेत त्या सबंधीत विभागाला तात्काळ पत्रव्यवहार पाठविण्याच्या सुचना दिल्या.

संकटातून संधी निर्माण करा

सध्या सर्वांवर संकट आले आह. या संकटाला मात करण्यासाठी सर्वांनी एकसंध होऊन लढले पाहिजे. या संकटाने खचून न जाता एक संधी आहे,  असे मानून एकत्र येऊन काम करावे. ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असेही आमदार देशमुख यांनी सांगत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता किंवा पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावी,  असे आवाहन केले.